- मग मी रोजच बघितली
सतत विस्कळीत
संबंधाची
सार्वभौम अदा
कितीदा भिरकावलं स्वतःला
पुढ्यात तुझ्या
अंथरला
पापुद्रा न पापुद्रा
चिंब कातडीचा
फाकला काळोख
माझ्या उबदार गर्भाशयातला
एकाएकी तुला
भ्रम झाला
प्रेमाचा
तू चुरगाळत राहिलास
पार उलथीपालथी होईस्तोवर मला
उमटवत राहिलास
तुझा प्रच्छन्न उपदंश
माझ्यावर
तुझे निर्ढावलेले डोळे
झोंबले,
सराईत
आरपार
तू काय शोधतोयस?
नग्नतेच्या आत
नग्नतेच्या बाहेर
एक कोरी जागा आहे फक्त
आणि तुला ती
सापडतच नाहीये
कळतंय मला
तू
खूप दु:खी आहेस