'आठ मार्चच कशाला
आता प्रत्येकच दिवस
आमचा असतो'
असा करावा का शेवट
सदरहू कवितेचा
उदारीकरणाच्या या तिठ्यावरून
आणि अधून मधून पेराव्यात ओळी
जालीम उपरोधाच्या
विद्रोही-बिद्रोही
लिहावेत तपशील हिंसेचे, भयाचे,
मारले जाण्याचे
जसे लिहित आलो आम्ही
न जाणो कुठल्या तारखेपासून
डोमेस्टिक व्हायोलन्स
ते वर्ल्ड कपसारखा
सार्वजनिक थरार बलात्काराचा.
तारखाच बदलल्या फक्त
किंचाळणाऱ्या अंधारात
हात पाय झाडणाऱ्या
दिवसाउजेडात
वेदनेनं विव्हळणाऱ्या.
या चिरव्याकुळ एकाकीपणाच्या होर्डिंग्जवर
उभं राहून आम्ही पसरवतोय
आमच्या मोकळ्या ढाकळ्या
हाडामांसाच्या प्रतिमा
प्रश्न हा नाहीये
की कुणी खाल्ली
मोहाची फुलं पहिल्यांदा
सगळे भौतिक संदर्भ छाटून
त्या धूर्त लिओनार्दोनं करून टाकलं
आम्हाला गूढ वगैरे
सोपंच अस्तंय हे
एकतर मोनालिसात रुपांतरण करणं
नाहीतर बाजारपेठेच्या मुक्त वाऱ्यावर
पाशवी रक्तानं भिजलेली
आमची अंतर्वस्त्र
निर्ममपणे सुकायला टाकणं
आम्ही फोडतोय
अजूनही तीच गुहा
तीक्ष्ण धारदार हत्यारांनी
तू घुमव तुझा आवाज
शेवटच्या धापा टाकणाऱ्या
या ग्लोकल रणधुमाळीत
राहिला मुद्दा आठ मार्चचा
जिवंत धडधडीचा
गुहा फोडण्याचा
पुन्हा पुन्हा