સ્ત્રી
ही चिडचिड असह्य
झोपेतल्या ग्लानीतही ओळखू यावेत
स्पर्श आवाज आकार
थांग हरवून बसलेला
हा दृश्यांचा ढोबळ समुद्र
डोळ्यांच्या झिलमिल पडद्यावर
याला कितीदा तरंगत ठेवू ?
आकस्मिक
अद्भुत
असाधारण
अपूर्व
गायब झालीय ‘अ'ची बाराखडी...
कबुल,
शाबूत ठेवावा लागतो
ढेर विश्वास
संकल्पनेवरचा, माणसांवरचा,
स्वतःवरचा सुद्धा,
पण मला एकदा तरी
अशी संहिता हवी आहे
जिथे सरकलेला असेल
केंद्रबिंदू फितरतीचा.
आहे का, आणखी एखादा दरवाजा ?
जिवंत मोकाट वाऱ्यासाठी
सताड उघडलेला !