तुम्ही रे दोन, दोनच माणसं
माझी उभ्या अख्ख्या गावांत
एक धाकुला, मनाचा किती किती मऊ सांग
तर दुसरा मोठा मोठा, जणू काय खडक थोरला
त्यांत सुद्धा मधाचा झरा गोडगोड
माया दोघांची नव्हे अशी तशी, सोनंच बावनकशी
एक लहानगा मंजूळपणे म्हणतो ताई
तर दुसरा मोठा आहे ना
तो तर देतो नुसता शिव्याच गो
पण कितीतरी, कितीतरी माया त्याची
बापासारखा आईसारखा
तुम्ही रक्ताची नसून सुद्धा
रक्ताहूनी सख्खी दोन
हा उभा गाव अख्खा गाव
म्हणतो मला पापी अवदसा
भाऊ रे भाऊ तूच सांग
रानातला झरा पापी असणार तरी कसा
गावाची नजर वाकडी वाकडी
त्यांना मी दिसणार तशी