जन पळभर म्हणतील 'हाय हाय' !
मी जाता राहिल कार्य काय ?
सूर्य तळपतील, चंद्र झळकतील,
तारे अपुला क्रम आचरतील,
असेच वारे पुढे वाहतील,
होईल काहि का अंतराय ?
मेघ वर्षतील, शेते पिकतील,
गर्वाने या नद्या वाहतील,
कुणा काळजी की न उमटतील,
पुन्हा तटावर हेच पाय ?
सखेसोयरे डोळे पुसतील,
पुन्हा आपुल्या कामि लागतील,
उठतिल, बसतील, हसुनि खिदळतील
मी जाता त्यांचे काय जाय ?
अशा जगास्तव काय कुढावे !
मोहि कुणाच्या का गुंतावे ?
हरिदूता का विन्मुख व्हावे ?
का जिरवु नये शांतीत काय ?