अजुनि लागलेचि दार, उजळे ही प्राची,
स्वेच्छ थंड गार झुळुक वाहतसे ताजी
जागवि जी रम्य वेळ
कमलादिक सुमन सकळ,
का न तुला जागवि परि, कमलनयन साची ?
देवि कांति, गीति, प्रीति
सकल मनी उत्सुक अति,
दारि उभ्या वाट बघति या तवागमाची
अरुणराग गगनि कांति
पक्षीगणी मधुर गीति
या हृदयी तशी प्रीति, तव पुरव हौस यांची
जीवित तुजवीण विफल
का मग हा विधिचा छळ ?
खचित तुझी मत्प्रीती छबि तव ही माझी
ऊठ रे मनोविराम
तिष्ठतसे मी सकाम
रुदन करी, कोठ परी मूर्ति ती जिवाची ?